अमरावती : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन २ व ३ ऑक्टोबर असे दोन दिवस अमरावती येथे होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. सुधीर रसाळ हे महनीय वक्ते असतील, अशी माहिती विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष विलास मराठे यांनी दिली.
साहित्य महामंडळाच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समीक्षक प्रा.डॉ. सुधीर रसाळ यांचा महामंडळाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारानंतर त्यांचे भाषण होईल. याशिवाय दुसऱ्या दिवशी ‘प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांची समीक्षा’ या विषयावर चर्चासत्रात डॉ. वसंत आबाजी डहाके (अमरावती), डॉ. नितीन रिंढे (मुंबई), डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर), डॉ. केशव तुपे (अमरावती) हे समीक्षेच्या वेगवेगळ्या अंगांनी अभ्यासपूर्ण निबंध वाचन करतील. समीक्षेशिवाय प्रा. रसाळांनी अलीकडच्या काळात अतिशय दर्जेदार ललितलेखनही केले आहे. याविषयी प्रा. प्रभा गणोरकर (अमरावती) या निबंध सादर करतील. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत पाटील (पुणे), तर दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अक्षयकुमार काळे (नागपूर) हे असतील. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे वर्धापनदिनाच्या उपक्रमामागची साहित्य महामंडळाची भूमिका मांडतील. साहित्य महामंडळाच्या बैठकीत कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे हे उपस्थित होते.