अमरावती : विधानसभा निवडणुकीची लगबग प्रशासनातही जोरदार सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी करावयाच्या उपायोजनांकरिता जिल्ह्यातील आठपैकी तीन मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर १५ साहाय्यकारी मतदान केंद्र प्रशासनामार्फत स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने रीतसर परवानगी दिली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात १५ साहाय्यकारी मतदान केंद्र सुरू केली जाणार आहेत यामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील चांदूर रेल्वे शहरात एक आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात मोडणाऱ्या गजानन विद्यालय, नवाथे, गोपालनगर, साईनगर व अन्य मतदान केंद्र मिळून आठ साहाय्यकारी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. अमरावती विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर साहाय्यकारी मतदान केंद्र स्थापन केली जाणार आहेत. वरील १५ मतदान केंद्रांवर १५०० पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे ही साहाय्यकारी मतदान केंद्र स्थापन केली जाणार आहे. बडनेरा, अचलपूर आणि दर्यापूर या तीन मतदार संघात २० मतदान केंद्राच्या इमारतीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये बडनेरा मतदार संघातील सहा मतदान केंद्रांचा समावेश आहे. दर्यापूर मतदारसंघातील तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. अचलपूूर मतदार संघातील पाच ठिकाणच्या मतदान केंद्रांच्या इमारतीत प्रशासनाने बदल केला असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील साहाय्यकारी मतदान केंद्राची घोषणा
By admin | Published: October 09, 2014 10:55 PM