लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विदर्भात नागपूर व यवतमाळच्या पाठोपाठ अमरावती शहरातही कोरोनाने आपले पाय पसरवणे सुरू ठेवले आहे. सोमवारी सकाळीच हाती आलेल्या वृत्तानुसार शहरात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २१ वर गेली आहे.
येथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये रविवारी रात्री आणखी एका व्यक्तीचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१ झाली आहे. त्या व्यक्तिच्या संपर्कातील १३ जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'ला दिली. ताजनगरातील एका ७२ वर्षीय व्यक्तीचे तीन दिवसांपूर्वी घरी निधन झाले होते. त्यांनी येथील पीडीएमसीमध्ये उपचार देखील केला होता. मृत्यू पश्चात त्यांचा नमुने अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्या कुटूंबियासह अंत्यसंस्काराला जे व्यक्ति उपस्थित होते, त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावतीमध्ये एकूण 21 कोरोनाग्रस्तांपैकी ७ मृत्यू, ४ कोरोनामुक्त व १० रुग्णांवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वृत्त लिहिस्तोवर अमरावतीचा समावेश रेडझोनमध्ये अधिकृतरीत्या करण्यात आला नव्हता; तथापि कुठल्याही क्षणी ती घोषणा होऊ शकेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.