अमरावती : सुमारे सहा महिन्यांपासून पसार असलेल्या बनावट नोटा प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले. स्थानिक कमेला ग्राऊंड येथील अजहर खॉ जुरावर खॉ (२४), असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता येथील न्यायालयासमोरुन त्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चाकू जप्त केला आहे.बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ग्रामीण गुन्हे शाखेने सहा महिन्यांपूर्वीच केला होता. १७ मे २०१४ रोजी पोलिसांनी या टोळीतील शेख सलीम शेख मुन्नू याला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक देशीकट्टा जप्त केला होता. त्यानंतर या टोळीचा मुख्य सुत्रधार वसीम चायना याला अटक केली होती. सहा महिन्यांपासून पसार असलेल्या अजहर खॉ हा येथील चांदणी चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणातील अहेफाज खॉ याचा मित्र आहे. अहेफाजला तो न्यायालयात भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यानुसार ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हिरुळकर, सहायक निरीक्षक किरण वानखडे, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, अरुण मेटे, प्रवीण देशमुख, मोहन मोहोड या पोलीस पथकाने न्यायालयाबाहेर सापळा रचला. त्यानुसार अजहर हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
बनावट नोटाप्रकरणातील आणखी एक अटकेत
By admin | Published: November 29, 2014 11:13 PM