अमरावती : बीएस्सी, इंजिनिअरिंग अशा परंपरागत शाखांना दूर सारून त्याने पाच-सात महिन्यांपूर्वी वैमानिक होण्याचे स्वप्न त्याने नुसते पाहिलेच नाही, तर अक्षरश: तो जगला. व्हायचे तर वैमानिकच, असा मनाशी संकल्प त्या २० वर्षीय तरुणाने अवघ्या चार महिन्यांपूर्वी फिलिपिन्स देश गाठला. तेथील एका इन्स्टिट्यूटमध्ये तो वैमानिकाचे धडे गिरवू लागला. पण हाय रे दैव! मंगळवारी तो व त्याचा पायलट असे दोघेच असलेले छोटे विमान फिलिपिन्स देशात अपघातग्रस्त झाले. गुरुवारी त्याचा मृतदेह मिळाला. हवेत उंच झेपावण्याचे त्याचे स्वप्न आकाशातच विरले. अंशुम राजकुमार कोंडे (२०) असे ते स्थानिक तरुणाचे नाव.
मोर्शी येथील राधाकृष्ण कॉलनी येथे राहणारा अंशुम हा फिलिपिन्स येथे वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेत होता. अंशुमने मोर्शी येथील आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयामधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. पायलट होण्याची आंतरिक इच्छा त्याला चार महिन्यांपूर्वी फिलिपिन्सला घेऊन गेली. त्याचा जवळचा मित्र तेथे पायलटचे ट्रेनिंग घेत होता. त्याच्यामागोमाग त्यानेदेखील फिलिपिन्स गाठले. तो २० एप्रिल रोजी मोर्शीला आला होता. तीच त्याची शेवटची भेट ठरली. अंशुमच्या अपघाती मृत्यूची माहिती गुरुवारी दुपारी ग्रामसेवक म्हणून निवृत्त झालेले वडील, आई, दोन बहिणी, धाकट्या भावाला मिळाली. आकाशात झेपावण्याची स्वप्न उराशी बाळगून दूरदेशी गेलेल्या अंशुमच्या अकाली एक्झिटने अख्खे कोंडे कुटुंब शून्यात हरविले आहे.
फिलिपिन्समधील दूतावासाशी खासदार-आमदारांचा संपर्क
फिलिपिन्स देशातील भारतीय दूतावासाने अंशुमच्या अपघाती मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. दरम्यान, त्याचे पार्थिव तेथून भारतात आणण्यासाठी खासदार नवनीत राणा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी प्रयत्न चालविले असल्याची माहिती अंशुमचे जवळचे नातेवाईक आशिष निळे यांनी दिली. निळे यांनीदेखील तेथील दूतावासाला मेल पाठविला आहे.
एअर अॅम्ब्यूलन्सने आणणार अंशूमचे पार्थिव
विमान अपघातात मृत्यू झालेला अंशुमचे पार्थिव फिलिपिन्स येथून एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्ली येथे आणले जाणार आहे. त्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेथील दुतावासासोबत संपर्क साधल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी दिली.