महापालिका पथकाचा पुढकार, वाहनचालकांना थांबवून केली कोरोना चाचणी
बडनेरा : महापालिका पथकाकडून जुनीवस्तीच्या सावता मैदानलगतच्या मुख्य मार्गावर रविवारी १०० लोकांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली. या मोहिमेत सहायक आयुक्तांसह महापालिकेचे कर्मचारी सहभागी होते.
रविवारपासून कठोर संचारबंदीत काहीशी शिथिलता मिळताच नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली. विनाकारण बाहेर पडू नका, असे प्रशासनाकडून सातत्याने सांगितले जात आहे. कारवाईदेखील केली जात आहे. मात्र, बरेच लोक विनाकारण फिरतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच आहे. याला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सातत्याने कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. २३ मे रोजी जुनीवस्तीतील सावता मैदानालगतच्या मार्गावर पथकाकडून शंभर लोकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यावेळी महापालिका बडनेरा झोनच्या सहायक आयुक्त विशाखा मोटघरे, भाग्यश्री बोरेकर, सहायक अभियंता दीपक खाडेकर, स्वास्थ्य निरीक्षक, इतर कर्मचारी उपस्थित होते. बहुतांश नागरिकांनी कोरोना चाचणी पथकाचे वाहन बघताच रस्ता बदलून पळ काढला. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अकारण फिरू नका, नियम पाळा, असे आवाहन केले जात आहे. संचारबंदीत काहीशी शिथिलता मिळाल्याने रविवारी वाहनचालकांची गर्दी दिसून पडली. मात्र, कोरोना चाचणी करणारे पथक व पोलिसांची गस्त पाहून अवघ्या काही वेळातच गर्दी कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. मनपा झोन क्रमांक ४ च्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात पथकाकडून चाचण्या केल्या जात आहेत.