नितीन टाले - कावली वसाड : शेतकरी आणि त्याचा कृषिकार्यातील सोबती असलेला बैल यांचे जिव्हाळ्याचे नाते वर्षानुवर्ष जपले गेले आहे. पशूंना हक्काची सुटी असणाऱ्या या एकमेव सणाचे आयोजन यंदा झालेले नसल्याने वसाड येथील शेतकऱ्यांनी हताशा व्यक्त केली आहे.
वसाड येथे मखराचा पोळा साजरा केला जातो. दीडशे वर्षांपूर्वी माधोजी इंगळे यांचे पुत्र धनबाजी इंगळे आणि नारायणराव इंगळे यांच्या घराण्यातून मखराची सुरुवात झाली. परंतु, त्याचा मान धनबाजी इंगळे यांची कन्या कमलाबाई कडू यांना मिळाला आणि त्यांच्या घरूनच मखराचा सजविलेला बैल निघू लागला. नारायणराव इंगळे यांचे वारस वसंतराव इंगळे, त्यानंतर सुनील इंगळे आणि बाळासाहेब इंगळे हे घाट व गुढी घेऊन निघतात. पोळ्याच्या तोरणाखालून प्रदक्षणा घालतात आणि बैलाची पूजा करतात. पूजा करीत असतानाच संपूर्ण पोळ्यामधून घाट फिरविला जातो. त्याचा प्रसाद घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी झालेली असते. घाटामध्ये हळद, ज्वारीचे पीठ असते. मखराचा बैल हे पोळ्याचे वैशिष्ट्य असते. या बैलाच्या शिंगाला मोठे जळते टेंभे बांधलेले असतात. हा आनंदाचा ठेवा दोन वर्षांपासून शेतकऱ्यांपासून हिरावला
गेला आहे. --------------
गतवर्षापासून मखराचा विशेष पोळा भरविला गेला नसल्याने हताश झालो आहोत. गावातील लोकसंख्येएवढे लोक शहरातील एखाद्या रस्त्यावरच दिसून पडतील. मात्र, कोरोना उपाययोजनांचा रोख गावांकडेच आहे.
- सुनील इंगळे, शेतकरी, वसाड
-----------
एकीकडे बैलजोड्या कमी झाल्या आहेत. कोरोनाचा बागुलबुवा आम्हालाच दाखविला जात आहे. पोळ्याच्या सणाचा आनंदही आनंद हिरावला जाणार की काय, अशी स्थिती आहे.
- प्रदीप केचे, शेतकरी, कावली