येवदा : स्थानिक पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील सर्वात मोठे परिसर असलेले एकमेव ठाणे आहे. येथे इंग्रजांच्या काळात छावणी थांबण्यासाठी स्थान होते. या जागेवर पोलीस ठाण्याची व पोलीस निवाऱ्यासाठी प्रशस्त इमारतीची निर्मिती झाली. ठाणे परिसराच्या आजूबाजूला काटेरी वृक्ष वाढलेले होते. ठाणेदार अमूल बच्छाव यांनी धुरा हाती घेताच या परिसराचा कायापालट झाला. त्यांनी परिसरातील पोलीस पाटील, समाजसेवक हाताशी धरून काटेरी झाडे तोडून परिसर पूर्णपणे स्वच्छ व सुशोभित वृक्षांची लागवड त्यांनी केली. अमूल बच्छाव यांनी बी.एस्सी. ॲग्री शिक्षण घेतले आहे. त्यामुळे शिक्षणाचा उपयोग या परिसरातील जनतेकरिता व्हावा, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. गावातील मुलांना पोलीस व सैन्य भरतीसाठी रनिंग ट्रॅक निर्मिती केली. सोबतच विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकासुद्धा उभारली. या सर्व बाबींची दखल घेण्याकरिता व उद्घाटनासाठी अमरावती जिल्ह्याचे एस. पी. हरि बालाजी एन. व गुन्हे शाखेचे तपन कोल्हे, आमदार बळवंत वानखडे, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, रामू शेठ मालपाणी, नितेश वानखडे यांना आमंत्रित केले होते. या रनिंग ट्रेक व मुलांच्या अभ्यासिका वाचनालयाचे उद्घाटन आमदार बळवंत वानखडे यांनी केले. पोलीस ठाण्याच्या परिसरात हरिबालाजी एन व आ. बळवंत वानखडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी ठाणेदार अमूल बच्छाव यांनी केलेले कार्य हे अप्रतिम आहे. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे असे सुशोभित व्हावे, असे वक्तव्य आ. वानखडे यांनी केले. एसपी हरिबालाजी एन. यांनी विद्यार्थी तसेच परिसरातील पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, या भागातील करियर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव फलकावर लावण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरिता त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या निवारणाचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी परिसरातील सर्व पोलीस पाटील समाजसेवक उपस्थित होते. ठाणेदार अमूल बच्छाव यांनी परिसरातील सर्व श्रमदान करणाऱ्या लोकांचे तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
एसपींनी दिली कौतुकाची थाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:09 AM