वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेकरिता दाखल करण्यात आलेले दस्तावेज बनावट निघाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनीच याबाबत संशय व्यक्त केल्यानंतर चौकशी करण्यात आली. या प्रकरणात शुक्रवारी अकोल्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्यासह दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ मिळण्याकरिता काठीपुरा येथील रहिवासी रहिमाबी मुस्तफा खान (५७, रा. कोकाटखेल, अंजनगाव) हिने बनावट दस्तावेज दाखल केले. याबाबत खात्री झाल्यावर १६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयामार्फत तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदार दीपक वानखडे यांनी या प्रकरणाची तीव्रता व शासनाची झालेली फसवणूक पाहता वेगाने चक्रे फिरवत आरोपी दलाल यासीनखाॕँ हसनखाॕँ (४७, रा. अजिजपुरा) याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मोठी साखळी असल्याचे निष्पन्न झाले.
यासीनच्या सांगण्यावरून राजेंद्र वानखेडे (४५, रा. सातेगाव) व त्याच्या चौकशीनंतर अनिल जाधव (४५, रा. अकोली जहागीर) यांना ताब्यात घेण्यात आले. शाळा सोडल्याचा बनावट दाखला कमलेश म. आहुजा (३३, रा. सिंधी कॕॅम्प, अकोला) याने बनविल्याचे समोर येताच अंजनगाव सुर्जीचे सहायक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी प्रदीप काईट यांच्या चमूने अकोला गाठून कमलेशला अटक केली. त्याच्याकडून बनावट दाखले ताब्यात घेण्यात आले. याशिवाय एक लॕॅपटाॕॅप, माॕॅनिटर, हार्ड डीक्स, स्कॅनर, प्रिंटर असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६७, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन आरोपींना जामीन मंजूर केला, तर बनावट दस्तावेज बनविणारा मुख्य सूत्रधार कमलेश आहुजा व अनिल जाधव यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडेयांच्या मार्गदर्शनात प्रदीप काईट, विजय शेवतकर, सूर्यकांत कांदे, प्रमोद चव्हाण करीत आहेत.
------------
संजय गांधी निराधार योजनेसंबंधी कागदपत्रांची तपासणी करताना एका प्रकरणात शाळेच्या टीसीबद्दल संशय आला. काकडा येथील शाळेच्या मुख्याध्यापिकांना टीसी पडताळणीकरिता पाठविली असता, ती खोटी असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागरिकांनी तहसीलसंबंधी कोठलेही प्रकरण सेतुमार्फत दाखल करावे. दलाल पैशांची मागणी करीत असल्यास पोलीस वा तहसीलदारांकडे तक्रार करावी.
- अभिजित जगताप, तहसीलदार
------------------
तहसीलदारांनी तक्रार केल्यानंतर चौकशी केली. गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर रॅकेट मोठे असल्याचे निदर्शनास आले. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करू. आणखी आरोपी अडकण्याची शक्यता आहे.
- राजेश वानखडे, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी