अंमलबजावणी : आरटीई प्रवेश प्रक्रियाअमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या पालकांची सर्वत्र गर्दी झाली असून गुरूवार १६ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार ७२५ अर्ज दाखल झाले होते. पालकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने यंदादेखील आरटीई प्रवेशासाठी मोठी चढाओढ राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाभरातून आरटीई वेबसाईटवरून ही आॅनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रामधून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरूवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीपासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. हे अर्ज सादर झाल्यानंतर लॉटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नर्सरी, केजी १, आणि पहिल्या वर्गात प्रवेश दिले. जातील आरटीईअंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून इच्छूक पालकांनी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची एकच घाई केली आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याने मोठया संख्येने आॅनलाईन अर्ज केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
अर्जाचा आकडा साडेतीन हजारांवर
By admin | Published: February 17, 2017 12:21 AM