सामाजिक न्याय विभाग : ११ वीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांंना होणार लाभअमरावती : समाज घटकातील विद्यार्थ्यांंना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे हेलपाटे दरवर्षी होऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना एकदाच शिष्यवृत्तीचा अर्ज भरावा लागणार आहे. पुढील शिक्षण होईस्तोवर त्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार नाही. हा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. याची अंमलबजावणी २0१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. विद्यार्थ्यांंनी अभ्यासक्रमासाठी इयत्ता ११ वीत प्रवेश घेतल्यानंतर पूर्ण शिक्षण होईस्तोवर त्यांना या सवलतीचा फायदा होणार आहे. यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पदवी ते पदव्युत्तरपर्यंंतचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांंना दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे लागत होते. विहीत मुदतीत अर्ज सादर न झाल्यास लाभापासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांंवर आल्याची अनेक उदाहरणे आहेत, या क्लिष्ट प्रक्रियेत महाविद्यालयीन कर्मचारी देखील विद्यार्थ्यांंना त्रस्त करीत असत. यानंतर सर्व अर्ज समाजकल्याण विभागाकडे जाऊन त्यांची पडताळणी होत असे. यातही छोटी चूक झाल्यास ते लाभापासून वंचित राहत असे. या सर्व प्रक्रियेमधून आता विद्यार्थ्यांंची सुटका झाली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी याच सत्रापासून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
एकदाच करावा लागणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज
By admin | Published: June 08, 2014 11:34 PM