फोटो -
कॅप्शन - आदिवासींना शासकीय योजनेची माहिती देणारा सोबत अर्ज वितरण करताना राहुल येवले.
चिखलदरा : राज्य आणि केंद्र शासनाच्या शेकडो योजना चालविल्या जातात. प्रत्यक्षात मेळघाटातील आदिवासींना आजही त्या माहीत नाही. यामुळे जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल येवले या दांपत्याने अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यात घरोघरी जाऊन योजना व त्याचा लाभ घेण्यासाठी अर्जाचे वितरण सुरू केले आहे. हा एक अभिनव प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
शासनाच्या योजनांचे भित्तिपत्रके, बॅनर, पोस्टर मोठ्या प्रमाणात लावून प्रशासकीय यंत्रणा व शासन मोकळे होत असले तरी प्रत्यक्षात गरजूंना त्याचा लाभ मिळावा, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचावी, या उदात्त हेतूने प्रत्यक्ष काम गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून युवक काँग्रेसतर्फे आदिवासी बंधूंना संपूर्ण हतरू जिल्हा परिषद सर्कल परिसरात मोफत शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या अर्जांचे वितरण राहुल येवले व पूजा राहुल येवले यांच्यावतीने होत आहे. यात श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डसाठी लागणारे सर्व अर्ज घरोघरी दिले जात आहेत. चुरणी, दहेंद्री, कोटमी, बुटिदा, बेरदा ढाणा, दहेन्द्री ढाणा अशा दुर्गम व अतिदुर्गम परिसरात हे कार्य महिन्याभरापासून सुरू आहे.
-------------------
कोट
शासनाच्या योजना प्रत्यक्ष आदिवासींच्या दारात नेऊन त्याचे निकष स्पष्ट करून या योजनेचे अर्ज भरून देण्याचे कार्यसुद्धा केले जात आहे, अन्यथा ते या योजनांपासून वंचित राहतील.
- राहुल येवले, प्रदेश सरचिटणीस, युवक काँग्रेस, अमरावती.