अमरावती : येथे शासकीय वौद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी डीनची नियुक्ती करण्यात येऊन निधी मंजूर करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता देण्याची मागणी कृती समितीद्वारा सोमवारी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत राज्यात सात मेडिकल कॉलेजची स्थापना होणार आहे. त्यात येथील मेडिकल कॉलेज आहे. जून २०१९ च्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत शासनाने अमरावतीच्या शासकीय वौद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. मार्च २०२० च्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनीही घोषणा केली. दुदैवाने या मेडिकल कॉलेज स्थापनेच्या हालचाली त्वरेने न झाल्याने प्रस्ताव थंडबस्त्यात पडला. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला निधी घोषित झाला. अर्थसंकल्पामध्ये कुठेही नसणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासनाने प्राधान्य देऊन डीनची नियुक्ती केली व निधी दिला. अमरावतीलाही निधी उपलब्ध करून डीनची नियुक्ती करण्याची मागणी शासकीय मेडिकल कॉळेज व अनुसंधान केंद्र कृती समितीद्वारा करण्यात आली. यावेळी संयोजक किरण पातूरकर, अनिल बोंडे, सुनील देशमुख, अविनाश चौधरी, विवेक कलोती, राजेश आखेगावकर, राधा कुरिल, विवेक चुटके, राजू मेटे, प्रकाश डिफे, सविता भागवत, मोनिका उमप, अलका सप्रे आदी उपस्थित होते.