पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान
अमरावती : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत तिवसा शहराकरिता १९ कोटी ५ लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी प्राप्त झाली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे या बहुप्रतीक्षित योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वत: मंजुरी प्रदान केली.उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नगरविकास विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गुरुवारी बैठक झाली. त्याला पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थिती लावली. या बैठकीत तिवसा शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. नियोजन, वित्त, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, मजीप्रा सदस्य सचिव, संचालक नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे, तिवस्याच्या उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे बैठकीला उपस्थित होत्या.
योजनेला मंजुरी मिळाल्याने तिवसा शहराचा अनेक वर्षांपासून असलेला पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार असून, दररोज पाणीपुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यानिमित्त सांगितले.