अमरावती : कारागृहे कैद्यांनी तुडूंब भरली आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असून अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न बिकट झाला आहे. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांकडून कारागृहात हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याच्या कारागृह विभागात दोन हजार नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून कारागृहांमधील रिक्त पदांचा तिढा सुटण्याचे हे संकेत मानले जात आहे.
‘लोकमत’ने यापूर्वी सातत्याने ‘कारागृहातील रिक्त पदांचे ग्रहण’, ‘कारागृहे कैद्यांनी हाऊसफुल्ल’, ‘दीड वर्षात आठ हजार कैदी वाढले’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करून अधिकारी-कर्मचारी रिक्त पदांचा गंभीर विषय शासन दरबारी निदर्शनास आणून दिला. अखेर कारागृह महानिरीक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कारागृह प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणला. एवढेच नव्हे कैद्यांना मानवाधिकारनुसार सोयी-सुविधांवरही भर दिला. विशेषत: अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत राज्य सरकारकडे नियमितपाठपुरावा केला. परिणामी सोमवारी मंत्रालयात कारागृह प्रशासनाचे अपर मुख्य सचिवांच्या (सेवा) यांच्या अध्यक्षेतखालीी उपसमितीची बैठक होऊन तब्बल दोन हजार नवीन पदांना मान्यता देण्याचा निर्णय झाला. ही कारागृह विभागासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या निर्णयामुळे येत्या काळात कारागृह विभागात तुरुंग अधिकारी, शिपाई पदभरती होणार आहे. राजपत्रित गट ‘अ’ मध्ये १६ जागा, राजपत्रित गट ‘ब’ १८ आणि अराजपत्रित गट ‘क’ वर्गवारीत १९६६ जागा अशी नव्याने पदांचा मान्यता मिळाली. आता शासन आदेशानंतर ही पदे समायोजन केली जाणार आहे.अशी मिळाली दोन हजार वाढीव पदांना मिळाली मान्यता
राजपत्रित गट ‘अ’: १ विशेष कारागृह महानिरीक्षक, २ अधीक्षक मध्यवर्ती कारागृह, ७ मानसशास्त्रज्ञ, १६ मनाेविकृती शास्त्रज्ञ.राजपत्रित गट ‘ब’ : ७ जिल्हा कारागृह अधीक्षक, ९ वैद्यकीय अधिकारी (वर्ग २), २ सहायक/ प्रशासन अधिकारी.
अराजपत्रित गट ‘क’: २६ वैद्यकीय अधिकारी (वर्ग ३), ५ कार्यालय अधीक्षक, ४५ तुरूंग अधिकारी (श्रेणी १), ११६ तुरूंग अधिकारी, २१ मिश्रक, १२ वरिष्ठ लिपीक, २१ लिपीक, ७ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ५६ सुभेदार, २७७ हवालदार, १३७० कारागृह शिपाई (महिला, पुरुष) तर, १० परिचालक.