अमरावती : बडनेरा मार्गालगतच्या नवाथे स्थित महापालिका जागेवर प्रस्तावित मल्टिप्लेक्स व्यापारी संकुल, मॉल उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार (पीएमसी) नियुक्तीसाठी मंगळवारी महापालिकेच्या विशेष सभेत गदारोळात मंजुरी प्रदान करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या जंबो चर्चेनंतर महापौर चेतन गावंडे यांनी या विषयावर शिक्कामोर्तब केले. विरोधकांच्या टीकेला फारसे गांभीर्याने घेण्यात आले नाही, हे विशेष.
महापौर चेतन गावंडे यांच्या पीठासीनाखाली उपमहापौर कुसूम साहू, आयुक्त प्रशांत रोडे, नगरसचिव मदन तांबेकर यांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने आयोजित विशेष सभेच्या कामकाजात सहभाग नोंदविला. सकाळी ११ वाजता प्रारंभ झालेल्या या सभेत अनेकदा गदारोळ, भाजप- कॉंग्रेसचे सदस्य आमने-सामने आलेत. दरम्यान आयुक्त प्रशांत रोडे यांनी नवाथे मल्टिप्लेक्स बाबत प्रशासनाची भूमिका विषद केली. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास ईंगोले, मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, रिपाईंचे गटनेते प्रकाश बनसोड, शिवसेनेचे प्रशांत वानखडे, एमआयएमचे अब्दूल नाजीम यांनी नवाथे मल्टिप्लेक्सचा विषय सर्वेाच्च न्यायालयात असताना पीएमसी नियुक्तीचा अट्टहास कशासाठी? असा सवाल उपस्थित करून भाजपच्या ईराद्यावर बोट ठेवले. तर दुसरीकडे भाजपचे पक्षनेता तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती सचिन रासने, सुनील काळे, अजय गोंडाणे, बसपाचे गटनेता चेतन पवार यांनी हा प्रकल्प महापालिका उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने अनिवार्य असल्याची बाब स्पष्ट केली. गत १६ वर्षापासून हा प्रकल्प रखडला असून, आणखी किती वर्ष लांबणीवर ठेवणार, असा टोलाही भाजपने लगावला. अखेर तीन तास झाल्यानंतरही विरोधक काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे बघून महापौर चेतन गावंडे यांनी ७९ अंतर्गत पीएमसी नियुक्तीला मंजुरी प्रदान केली.
---------------------
विशेष सभा ही आभासी पद्धतीने होती. त्यामुळे नवाथे मल्टिप्लेक्सच्या ‘पीएमसी’ नियुक्तीचा निर्णय हा बहुमतानेच होणे नियमावली आहे. तरीही सत्तापक्ष भाजपने मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा विषय मंजूर केला. याबाबत सभागृहात प्रशासनाने तक्रार केली जाईल.
- विलास ईंगोले, माजी महापौर.
-----------
सर्वेाच्च् न्यायालयात हे प्रकरण असताना ‘पीएमसी’ मंजुरीची घाई कशासाठी? हा महत्वाचा प्रश्न आहे. उत्पन्न महापालिका की भाजप, कुणाचे वाढणार हा खरा सवाल आहे. आभासी पद्धतीने ही सभा असुनही अल्प सदस्यांच्या उपस्थिती विषय मंजुर करणे ही शोकांतिका आहे. मल्टिप्लेक्सची जागा ३०० कोटींची असताना केवळ ८९ कोटींची दर्शविण्यात आली आहे.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता. कॉंग्रेस
-------------
नवाथे मल्टिप्लेक्स ‘पीएमसी’ नियुक्ती ही २०१९ स्थायी समितीने दिली आहे. यापूर्वी दोन सभेत हा विषय आणला असता हेतुपुरस्सरपणे विराेध करण्यात आला. विरोधी सदस्यांना विकास नको आहे, हे त्यांचे मंगळवारी सभागृहात वागणे होते. पीएमसी नियुक्ती ही हा प्रकल्पाचा आरसा असणार आहे. मल्टिप्लेक्स कुणी साकारावे, हा नंतरचा प्रश्न आहे.
- तुषार भारतीय, पक्षनेता, भाजप
---------------
बॉक्स
कोण विरोधात, कोण सत्तेत हे कळलेच नाही?
नवाथे मल्टिप्लेक्सच्या ‘पीएमसी’ नियुक्तीचा विषय सभागृहात चर्चिल्या जात असताना कोण विरोधात, कोण सत्तेत आहे, हे नगरसेवकांच्या वागण्यावरुन स्पष्ट होत नव्हते. सत्तापक्ष असलेल्या भाजपचे बाळासाहेब भुयार, मिलिंद चिमोटे, गोपाल डहाके, रिपाईचे गटनेता प्रकाश बनसोड यांनी कॉंग्रेसच्या बाजुने मते नोंदविली. तर बसपाचे गटनेता चेतन पवार हे भाजपच्या बाजुने उभे होते.