अमरावती : उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त २६० प्राचार्यांच्या पदभरतीला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयानुसार अमरावती विभागातील सुमारे ७० रिक्त प्राचार्य पदभरतीचा मार्ग सुकर होणार आहे.
शासनाच्या ८ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकान्वये राज्यात रिक्त २६० प्राचार्याची पदे भरण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या पदांना मान्यता देताना वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीची अट शिथिल केली आहे. वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राचार्य मिळावे, यासाठी सातत्याने मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतली आहे. प्राचार्यांची पदे भरताना सहसंचालकांना संचालकांच्या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. पदभरतीची प्रक्रिया राबविताना नाहरकत प्रमाणपत्र निर्गमित झाल्यानंतर विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून तात्काळ कार्यवाही करावी लागेल. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य पदाची वेतननिश्चिती ३७,४०० ते ६७ हजार व एजीपी १० हजार या वेतनश्रेणीत किमान ४३ हजार इतक्या वेतनावर निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत रिक्त ७० प्राचार्यांची पदे भरण्यात येतील, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी दिली.