अमरावती : कोरोनाचे वाढत्या संसर्गात काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची उपलब्धता असणाऱ्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेले जाते. प्रसंगी बेड उपलब्ध नसल्यास अन्य रुग्णालयांतही न्यावे लागते. परंतु, या रुग्णावाहिकेच्या दराबाबत एकवाक्यता नाही. रुग्णांच्या नातेवाइकाची हतबलता पाहून मनमानी दराची आकारणी होत असल्याचा आरोप आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक रुग्णावाहिकांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कधी मोफत, तर कधी माफक दरात सेवा दिली. मात्र, त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये झालेला कोरोना उद्रेक व आता मार्च महिन्यांपासून वाढलेल्या कोरोना संसर्गात मात्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे काही उदाहरणे समोर येत आहेत.
जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधेच्या २९ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी बहुतांश खासगी आहेत. या रुग्णवाहिका चालकांनी आता शासनाने निश्चत केलेले दर बासनात गुंडाळून ठेवले व दामदुप्पट भावाने आता आकारणी केली जात आहे. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. यावर नियंत्रण कुणाचे, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
पाईंटर
ऑक्सिजन असलेल्या : २९
शासकीय रुग्णवाहिका : १३०
ऑक्सिजन असलेल्या : १८
खासगी रुग्णवाहिका : २२१
बॉक्स
नियंत्रण कुणाचे?
शासकीय रुग्णवाहिका मोफत असली तरी ती वेळेवर उपलब्ध होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ऐनवेळी खासगी रुग्णवाहिकेला बोलवावे लागते. परिस्थिती अशी असते की, त्याने मागेल ते दर मुकाट्याने द्यावे लागतात, अन्यथा हा विलंब रुग्णांचे जिवावर बेतणारा ठरतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था झालेली आहे.
बॉक्स
रुग्णांचे नातेवाईक हतबल
शासकीय रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव खासगी रुग्णावाहिकेचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी शासनाद्वारे निश्चित दराला विचारतो कोण, अशी परिस्थती उद्भवते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दर निर्धारित केले असले तरी रुग्णवाहिकाचालक सांगेल तो दर मुकाट्याने द्यावा लागत असल्याची व्यथा रुग्णाच्या नातेवाइकांनी बोलून दाखविली.
बॉक्स
तक्रार करायची तरी कुठे?
ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिकेच्या मनमानी दराबाबत तक्रार करायची तरी कुठे, असा रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल, असे सांगण्यात आले. याविषयीची पुरेशी प्रसिद्धी होणे महत्त्वाचे आहे.
कोट
ऑक्सिजन असलेल्या रुग्णवाहिकेच्या दरासंदर्भात यापूर्वीच दरनिश्चिती करण्यात आली. त्यानुसारच भाडे घेणे महत्त्वाचे आहे. आगाऊ दर आकारणी झाल्यास त्याविषयीची तक्रार करावी.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी