नांदगाव खंडेश्वर : राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी अलोने हिने सब ज्युनिअर गटातील रिकव्हर प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
भारतीय धनुर्विद्या संघटना व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना यांच्या विद्यमाने अमरावती येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तिसरी एनटीपीसी राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धा आयोजित केली आहे. मुलींच्या या गटामध्ये मंजिरी अलोने हिने हरयाणाच्या तमन्ना देशवालचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. हरयाणाच्या भजन कौरला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वीसुद्धा जमशेदपूर येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय नामांकन स्पर्धेत मंजिरीने सुवर्ण पदक प्राप्त केले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील पदक विजेते खेळाडू सहभागी झाले आहेत.
मंजिरी अलोने ही एकलव्य गुरुकुल स्कूल येथे दहाव्या वर्गात शिकत आहे. खेळासोबतच शिक्षण घेऊन मंजिरी अलोने आज विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेती ठरली आहे. मंजिरी आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात सराव करते. तिच्या यशाबद्दल एकलव्य धनुर्विद्या अकादमीचे मार्गदर्शक सदानंद जाधव, भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, उपसंचालक विजय संतान, एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे पदाधिकारी, उत्तमराव मुरादे, राजेंद्र लवंगे, विलास मारोटकर, विशाल ढवळे, अनुप काकडे, उमेश परसनकर, महेंद्र मेटकर, अनिल निकोडे, पवन जाधव आदींनी समाधान मानले.