लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील विविध आस्थापनेत काम करणाऱ्या बंगाली कामगारांची सर्चिग हाती घेतली आहे. या मोहिमेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
शहरातील ज्या व्यावसायिक संकुलात, आस्थापनेत, कारखान्यात बंगाली कामगार काम करीत आहेत, त्यात कुणी बांगलादेशी आहे का? याचा शोध त्यातून घेतला जात आहे. त्यांचे आधार कार्ड खरे की बनावट तेदेखील आधार आयडेंटीफिकेशनद्वारे तपासले जात आहे. क्राइम युनिट दोनचे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने गुरुवारी रहाटगाव रोडवरील एका बिझनेस पार्कमधील रेडिमेड कापड निर्मितीच्या कारखान्यांत जाऊन तेथील बंगाली कामगारांची कसून तपासणी केली. त्यांचे ठसे आधार कार्डशी जुळतात की कसे, ते देखील प्राधान्याने पाहिले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे सीपी नविनचंद्र रेड्डी यांनी सखोल निरिक्षणाअंती शहरात काम करत असलेल्या त्या बंगाली कामगारांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. शहरातील ज्वेलरी व गारमेंटमध्ये काम करणाऱ्यांसह हॉकर्स म्हणून काम करणाऱ्या बंगाली कामगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले निर्देश अभिनेता सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी निघाल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना बांगलादेशी घुसखोरांविरूद्ध कारवाईसाठी पत्र पाठविले आहे.
अकोला, अंजनगावात बांग्लादेशी?
- बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अकोला जिल्ह्यातून सुमारे १५ हजार बांगलादेशींना जन्माचे दाखले दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दि.२२ जानेवारी रोजी केला आहे.
- अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून सुमारे १२०० बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिले गेले, असा आरोपदेखील सोमय्या यांनी केला होता.
- उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये अमरावतीमधील बांगलादेशींना शोधून काढा, असे निवेदन पोलिस उपायुक्तांना दिले होते. त्या सर्व पार्श्वभूमिवर सीपींनी तक्रार निवारण व गुन्हे निर्गती अभियाना नंतर ही मोहिम हाती घेतली आहे.
९४ हून अधिक बंगाली कामगारांची झाडाझडतीनांदगाव पेठ रोडवरील तीन-चार व्यावसायिक संकुले, दोन्ही एमआयडीसी व ते बंगाली मजूर राहत असलेल्या अन्सारनगर, लालखडी भागातही ती मोहीम राबविली जाईल.
"शहरातील ज्वेलरी व गारमेंट इंडस्ट्रिजमध्ये काम करणारे व काही हॉकर्सदेखील बंगाली आहेत. त्यांचे आधार कार्ड खरे की बनावट ती तपासणी केली जात आहे. ती मोहिम पुढील काही दिवस निरंतर सुरू राहिल." - नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त