- अनिल कडू
अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र ७५० चौरस किलोमीटरने वाढणार आहे. यात प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्र घटणार आहे. पूर्व मेळघाट प्रादेशिक वनविभाग हा व्याघ्र प्रकल्पात जाईल, तर पश्चिम मेळघाट वनविभागाऐवजी मेळघाट प्रादेशिक वनविभाग अस्तित्वात येणार आहे.१९७४ ला मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र १५७१.७४ चौरस किलोमीटर होते. पुढे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविले गेले. आज व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र २०२९.०४ चौरस किलोमीटर आहे. १ मेपासून होऊ घातलेल्या नव्या क्षेत्रवाढीमुळे व्याघ्र प्रकल्पात ७५० चौरस किलोमीटरचे क्षेत्र जोडल्या जाणार आहे. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे २७७९ चौरस किलोमीटर होणार आहे.एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, युनिफाइड कंट्रोल अंतर्गत या क्षेत्रवाढीचा प्रस्ताव व्याघ्र प्रकल्पाने सादर केला आहे. यात पूर्व मेळघाट प्रादेशिक वनविभागातील घटांग, चिखलदरा, अंजनगाव वनपरिक्षेत्रातील काही भाग आणि पश्चिम मेळघाट प्रादेशिक वनविभागातील आकोट, धूळघाट, ढाकणा वनपरिक्षेत्र व्याघ्र प्रकल्पाने आपल्याकडे घेतले आहे. सोबतच अकोला आणि बुलडाणा वनपरिक्षेत्रातील प्रत्येकी दोन बीटमधील वनक्षेत्र व्याघ्र प्रकल्पाला जोडले जाणार आहे. यात पूर्व आणि पश्चिम मेळघाट वनविभागातील वनक्षेत्र ४५ ते ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. कमी होणारे क्षेत्र व्याघ्र प्रकल्प क्षेत्राला लागून आहे. पूर्व मेळघाट वनविभाग व्याघ्र प्रकल्पात जोडले जाणार आहे. तेथील प्रशासन, व्यवस्थापन व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येईल, तर पश्चिम मेळघाट वनविभागाऐवजी मेळघाट प्रादेशिक वनविभाग अस्तित्वात येणार आहे. या नव्या मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय परतवाडा येथेच राहणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत गुगामल, सिपना आणि आकोट असे तीन वन्यजीव विभाग आहेत. या क्षेत्रवाढीमुळे व्याघ्र प्रकल्पात पूर्व मेळघाट वन्यजीव विभागाची नव्याने भर पडणार आहे. क्षेत्रवाढीच्या अनुषंगाने प्रादेशिक वनविभाग व वन्यजीव विभागातील वरिष्ठ अधिकाºयांची बैठक पार पडली असून, प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. शासनस्तरावरूनही प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली आहे. क्षेत्रवाढ आणि तेथील कामकाज, प्रशासन या अनुषंगाने २१ व २२ एप्रिलला ठाण्यात वरिष्ठ अधिकाºयांची परत बैठक आयोजित आहे.क्षेत्रवाढीनंतर परतवाडा येथील गुगामल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदरा येथे, तर चिखलदरा येथील पूर्व मेळघाट विभागाचे कार्यालय परतवाडा येथे हलविण्याचेही प्रस्तावित आहे.
एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार युनिफाइड कंट्रोल अंतर्गत क्षेत्रवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. व्याघ्र प्रकल्पाचे गाभा (कोर) क्षेत्र मनुष्यविरहीत असावे. बफर क्षेत्रातील मनुष्य व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावा, याकरिता ही क्षेत्रवाढ आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रक्रिया पार पाडली जात आहे. १ मेपासून वाढीव क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाकडे यावे, याकरिता आमचे प्रयत्न आहेत.- विशाल माळीउपवनसंरक्षक व्याघ्र प्रकल्प.