लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना असलेल्या लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत मिशन कवचकुंडल अभियान राबविण्यात आले. आता केंद्राच्या आरोग्य विभागाचे ‘हर घर दस्तक’ अभियान ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या अभियानात सूक्ष्म नियोजनाद्वारे लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देणार आहेत. याद्वारे कुटुंबातील लसीकरण व्हायचे आहे काय, याची माहिती घेणार आहे. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरेदेखील आयोजित करण्यात येणार आहेत. शहरातील झोपडपट्टी व अस्वच्छ भागात घरोघरी भेट देऊन कोरोना संशयित वा अन्य आजारी व्यक्तींची स्थिती जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.मिशन युवा स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शहरात अनेक भागांत लसीकरण शिबिरे नुकतीच आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय सामाजिक संस्थांद्वाराही शिबिरे घेण्यात आली आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारेही लसीकरणाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचा टक्का अद्यापही कमी असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १७.९९ लाख लसवंत जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत १७,९९,१२५ नागरिकांचे लसीकरण झाले. यात १२,२८,२२४ नागरिकांनी पहिला व ५,७०,९०१ नागरिकांनी दोनही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८,७५,०६० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्ड १५,०१,६३० व कोव्हॅक्सिनचे ३,७३,४३० डोस प्राप्त झाले आहेत.
रविवारी फक्त १० जणांचे लसीकरणदीपोत्सवात लसीकरणाची मोहीम मंदावली आहे. या काळात बहुतांश केंद्रे बंद होती. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी जिल्ह्यात फक्त १० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील सहा जण आहेत. पहिला डोस घेतलेल्या बहुतेक नागरिकांचा दुसरा डोस घेण्याचा ८४ दिवसांचा कालावधी व्हायचा असल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे.