सहा महिन्यांचे प्रशिक्षण द्या : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची मागणीअमरावती : शासनाने तलाठी कार्यालये टेक्नोसॅव्ही करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे तलाठी कार्यालयांत सुविधा नसल्याने तलाठ्यांची काम करताना मोठी कसरत होत आहे. शासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे. ७ नोव्हेबर रोजी अमरावती तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले.याशिवाय १६ नोव्हेबर पासून सामुहीक रजा टाकून आंदोलन केले जाणार आहे. शासनाने सातबारा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला असून तलाठ्यांनी अंमलबजावणीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे तांत्रिक अडचणीमुळे तलाठ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आॅनलाईन सातबारे मिळत नसल्याने नागरिक व तलाठ्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे ई-फेरफार करण्यास अडचणी येत आहेत. सर्व्हर चालत नसल्याने विषम दिनांकाला कामे करावी लागत आहेत. रात्री उशिरापर्यंत बसून संगणकात नोंदणी कराव्या लागतात. तलाठ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तलाठी संघातर्फे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये तलाठी सांझ्याची व मंडळाची पुनर्रचना करावी, संगणकिकरण व ई -फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनीज वसुलीत तलाठयांना वगळण्या त यावे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयले बांधण्यात यावे, पदोन्नतीसाठी व्दिस्तरीय पध्दतीचा अवलंब करावा आदी मागण्यासाठी तलाठी संघाने आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. या आंदोलनात एस आर उगले, ए.एम पाटेकर, एस.आर. भगत, उज्ज्वला शेगावकर, तर भातकुली तालुक्यातील विजय धर्मासरे, राजेंद्र धोटे, डी.टी. वऱ्हाडे, व्हि.एम दुधे, एन.पी. खडसे, एम.एस सोनोने मनीष अकोलकर, आरबी चोरपगार, व्ही.पी. मसने, एन.एन. सावंत, एम. पी. देशमुख, आदींचा समावेश होता. दरम्यान आंदोलनस्थळी आ. यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन लक्षवेधी करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)
तलाठ्यांनी उपसले आंदोलनाचे अस्त्र
By admin | Published: November 08, 2016 12:18 AM