लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अर्पिता ठाकरे हिच्या हत्येच्या घटनेचा निषेध बुधवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने नोंदविला. यासंदर्भात महिला काँग्रेसच्या सचिव सुजाता झाडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून महिला सुरक्षाविषयी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.प्रेमप्रकरणातून मलकापुरातील रहिवासी तुषार मस्करेने कवठा बहाळे येथील अर्पिता ठाकरेची चाकूने निर्घृण हत्या केली. तिच्यावर सात गंभीर वार करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या खुनाच्या थरारामुळे महिला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मुली, महिला व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाप्रकारच्या घटना घडू नये, यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन, दोषीला शिक्षा व्हावी, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपाययोजना करा, नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.यावेळी सुजाता झाडे, माया गावंडे, उमा पवार, सुरेखा कविटकर, जयश्री वानखडे, नाजीमा परवीन, उर्सीया फातेमा, नीलिमा काळे, अर्चना सवाई, सुजाता देशमुख, कल्याणी कविटकर, कल्पना गावंडे, नीलिमा निंभोरकर उपस्थित होत्या.
अर्पिता ठाकरे हत्येच्या घटनेचा महिला काँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:39 AM