पान ३
अमरावती : म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड व ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. कोरोनाबाधित बरे झाल्यानंतरच्या काळात अधिक काळजी घेतली गेली पाहिजे. त्यानुसार बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांना पोस्ट कोविड घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करावे तसेच त्यांच्याशी त्यानंतरही नियमित संपर्क व समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डायलिसिस सेंटर आवश्यक
अमरावती शहराहून लांब अंतरावर असलेल्या गावांतील रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेंटरची उभारणी आवश्यक आहे. त्यासंबंधी सविस्तर प्रस्ताव द्यावा. आवश्यक साहित्य, मनुष्यबळ आदी सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रुग्णांना विनामूल्य उपचार महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेत मिळाले पाहिजेत. त्यानुषंगाने या योजनेचा अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी दिले.