जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे प्रकरण
अमरावती : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे दलितविरोधी असून, त्यांना तात्काळ अटक करून पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील ग्रामस्थांनी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना शुक्रवारी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, दलित समाजातील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांना परमबीर सिंह यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात पाठविले होते. एवढेच नव्हे तर घाडगे यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षापर्यंत अंडा सेलमध्ये डांबून ठेवले होते. ज्या खोट्या गुन्ह्यात परमबीर सिंह यांनी पोलीस निरीक्षक घाडगे व त्यांच्या पत्नीला अडकविले होते, त्या गुन्ह्यातून न्यायालयाने घाडगे दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ॲट्राॅसिटीप्रकरणी परमबीर सिंह यांना अटक करून दलित समाजावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी गजानन लांजेवार, बंटी पाटील, संदीप चुडे, नीलकंठ मेश्राम, भीमराव बेठेकर आदींनी केली आहे.