मागणी : शिवसेनेसह विविध संघटनांचे शासनाला निवेदनअमरावती : भातकुली तालुक्यामधील भालसी येथील रहिवासी व मुंबई येथील वरळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत महिला शिपाई माधुरी सोळंके हिच्या हत्येप्रकरणी मारेकऱ्यास तत्काळ अटक करावी या मागणीसाठी शनिवारी शिवसेना, भाजपासह विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा कचेरीवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. माधुरी सोळंके या १४ आॅगस्टला कर्तव्य बजावून उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत म्हणून तिच्या बहिणीने वरळी ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी तक्रार घेतली व तिचा मृतदेह आढळला व बेवारस म्हणून नोंद केली. वरळी ठाण्यात माधुरीच्या बहीणीची तक्रार वेळीच घेतली असती तर तीचा शोध घेता आला असता. मात्र, ती एक पोलीस शिपाई असताना सुध्दा वरळी ठाण्यात कुठलेही सहकार्य करण्यात आलेले नाही. किबंहूना पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहे असा आरोप विविध संघटनांनी निवेदनाद्वारे केला. माधुरीच्या गळ्यावर, हातावर व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. माधुरीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. या प्रकाराची चौकशी करून आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, नाना नागमोते व माधुरीच्या आई-वडिलांनी केली. या घटनेची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष कृष्णराव चव्हाण, आदिवासी पारधी विकास परिषदेचे शिवलाल पवार, त्रिरीष चव्हाण, रेखा पवार, बन्सीलाल पवार, पन्नालाल मावळे, भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडीचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी, पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, पांडूरंग चव्हाण, सुखदेवराव पवार, आदिवासी पारधी समाज बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, सुखदेवराव पवार, विवेक इंगोले, राजेश चव्हाण, चरणदास सोळंके, देवीदास चव्हाण, पंजाबराव पवार, राजेंद्र सोळंके आदींनी केली. (प्रतिनिधी)
माधुरीच्या मारेकऱ्यांना अटक करा
By admin | Published: August 21, 2016 12:02 AM