गणेश वासनिक - अमरावतीमहानगरातील सीमेलगतच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची बेसुमार संख्या वाढल्यामुळे कुत्र्यांची शिकार करण्याच्या आकर्षणापोटी बिबट्या शहरात शिरत आहेत. त्यामुळे बिबट आणि मानव असा संघर्ष अटळ असून ही बाब भविष्यातील धोक्याची घंटा मानली जात आहे.वन्यप्राण्यांमध्ये अत्यंत चपळ, चतूर असा स्वभाव असलेला बिबट हा जंगल आणि शहराच्या वातावरणात एकरुप होऊन वास्तव्य करतो. त्यामुळे काही दिवसांपासून बिबट हा शहराच्या सीमेवरच आढळत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. प्रामुख्याने बिबट हा त्याच्या आकारापेक्षा लहान प्राण्यांची शिकार करणे पसंत करतो. त्याचे आवडते खाद्य हे माकड आणि कुत्र्याचे मांस आहे. विशेषत: बिबट हा माकडाची शिकार करण्यात पटाईत असून शेळ्या, मेंढ्या व कुत्र्यांची शिकार तो सहजतेने करीत असल्याची माहिती वन्यजीव प्रेमींनी दिली. काही महिन्यांपासून टाकाऊ प्रदार्थ, घाण, केरकचरा आणि हॉटेलमधून निघणारे शिळे अन्न, मांसाचे तुकडे, कोंबड्यांची पंखं हे कम्पोस्ट डेपोत न टाकता ती सीमेलगतच्या जंगलात आणून टाकली जातात. परिणामी शहरातील मोकाट कुत्रे हे मांस, शिळे अन्न खाण्यासाठी जंगलाच्या दिशेने धाव घेतात. काहीजण शहराच्या सीमेलगतच्या जंगलात ओली पार्टी, मटण खाऊन त्याच ठिकाणी हाडे, मांस टाकून देतात. उष्टे मांस, हाडे खाण्यासाठी मोकाट कुत्रे जंगलात फिरत असून बिबट कुत्र्यांच्या शोधात शहरालगत येत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. हेसुद्धा बिबट आकर्षणाला कारण ठरत आहे. अशातच एखाद्याप्रसंगी बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्यास ते मांस पुन्हा पुन्हा खाण्यासाठी बिबट त्याच दिशेने धाव घेतो. शिकार केलेल्या भागात दोन ते चार दिवसांपर्यंत बिबट त्या परिसरात फिरतो. मोकाट कुत्र्याच्या शोधात बिबट हा पोहरा मार्ग, भानखेडा, छत्री तलाव परिसर, अंजनगाव बारी, रहाटगाव महामार्ग ते शेगाव, नवसारी रिंगरोड, बडनेरा ते कोंडेश्वर, भातकुली मार्गावर आढळल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरात धोका असल्याचे चित्र आहे. जंगलाचा बेसुमार ऱ्हास होत असल्याने बिबट जंगलाबाहेर पडताहेत हेसुद्धा एक कारण होऊ शकतो. सुकळी येथील कंम्पोस्ट डेपो परिसरात मोठ्या संख्येने मोकाट कुत्र्यांचा हैदोस असल्यामुळे या भागातही बिबट शिकारीच्या शोधात येण्याचे टाळता येणार नाही, असे पशुवैद्यकीय अधिकारी अरविंद उडाखे यांचे म्हणणे आहे. मोकाट कुत्र्यांमुळे बिबट्याचा शहराच्या दिशेने होत असलेल्या आगमनावरून महापालिका प्रशासनाने प्राणी प्रजनन नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली नाही, असे दिसून येते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह, वनविभागाने दक्षता घेणे काळाची गरज आहे. अन्यथा बिबट आणि मानव असा संघर्ष अटळ आहे.
शहरात बिबट्याचे आगमन; धोक्याची घंटा
By admin | Published: November 23, 2014 11:11 PM