अमरावती - निसर्गात ऋतुनुसार सतत बदल होत असतात. दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा या बदलाचाच एक भाग आहे. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत अनेक दूरदेशीचे पाहुणे पक्षी येतात. यावर्षीसुद्धा राज्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. या पाहुण्यांनी नद्या, तलाव व इतर पाणथळीची ठिकाणे व्यापून टाकली आहेत. निसर्ग संतुलनाचा लाभ होत आहे.
पक्षी हे ज्या भागातून स्थलांतर करून येतात त्या भागात ऋतुनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्यामुळे खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात. भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागांतून राज्यात अनेक पक्षी आले आहेत. काही पक्षी तर हजारो किलोमीटरचा प्रवास करतात पर्यंतचा प्रवास करतात. पक्षी हे साधारणत: ताशी ४० ते ६० कि.मी. च्या वेगाने उडतात. स्थलांतरणात पक्षी दिवसा व रात्रीही प्रवास करतात. हिमालयाकडून केरळ भागात म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर हे देशांतर्गतही असते. तर काहींचे आर्टिक्ट ते अंटार्क्टिक म्हणजे देशाबाहेरूनही आले आहेत. सायबेरियामधून येणारे कांड्या करकोचा व साधा करकोचा यांचे अजून दर्शन झाले नसल्याचे दिशा फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी सांगितले. पर्यावरण स्वच्छ राखण्यात मदतपक्ष्यांचे स्थलांतर हे अनेक अंगाने फायद्याचे आहे. निसर्ग संतुलनात पक्षी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. विदेशातील हे पाहुणे पक्षी पाण्यातील, हवेतील व वनस्पतीवरील असंख्य कीटक खातात. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. पक्ष्यांचा अभ्यास व निरीक्षणे करण्यासाठी व त्याची छायाचित्रे घेण्यासाठी अनेक पक्षिप्रेमी त्यांच्या येण्याची वाटच पाहत असतात. जागतिक हवामान बदलांची परिस्थिती व वनसंवर्धांत पक्ष्यांचे स्थलांतर अनेक अंगाने महत्वाची आहे.विदर्भात जलाशयावर गर्दी विदर्भात जलाशयावर परदेशी पक्ष्यांची गर्दी केली आहे. यात स्थलांतरित पक्षी राजहंस, तनई, गजरा, परी, सरग, चिमण शेंद्र्या, लहान रेव टिटवा, पानटिवळा, मोठा पानलावा, छोटा टिलवा, जलरंक, तपकिरी डोक्याचा कुरव, शेंडी बदक दर्शन झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील नळ दमयंती सागर, केकतपूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा व छत्री या जलाशयावर पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. मेळघाट व पोहरा मालखेड राखीव जंगलात कृष्ण थिरथिरा, निलय, राखी डोक्याची लिटकुरी, वरटी पाखरू हे रानपक्षी देखील दिसून आले. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती, इसापूर व बेंबळा प्रकल्पातील जलाशय, निळोना व दारव्हा तालुक्यातील शिंदी अंतरगाव येथील तलावावर राजहंस व कृष्ण ढोक पक्ष्याचे दर्शन झाले. वाशीम जिल्ह्यातील महान, पिंजर, एकबुर्जी तलाव येथे राजहंस तर गोंदिया, भंडारा व नवेगाव तसेच अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा येथे स्थलांतरित पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी केली आहे.