कावली वसाड : गतवर्षीपेक्षा यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पीक घेतले आहे. त्यामुळे चाऱ्याचे क्षेत्र वाढले. परंतु, गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना हा चारा उपलब्ध न करता, मेंढपाळ मोठ्या प्रमाणात बोलावण्यात आले आहेत. मेंढ्यांमुळे गावातील जनावरांना मात्र चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी रासायनिक खताच्या भाववाढीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कानावर पडत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेणखताला अधिक पसंती दिली. त्यामुळे शेणखताचे दर वधारले. आता त्याचेही दर शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने अनेकांनी शेतात मेंढपाळांना चाऱ्याच्या मोबदल्यात मेंढ्या बसविण्याची विनंती केली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचे आगमन झाले आहे. त्या गावातील जनावरांचा चारा खात आहेत. मेंढपाळांचा उलंगवाडी झालेल्या शेतांवर ताबा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.