परतवाडा (अमरावती) : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या गांधारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी स्वागतगीत म्हणण्यासाठी आमंत्रित केले आहे. जिल्ह्याला तिच्या रूपाने बहुमान प्राप्त झाला आहे.
माय होम इंडिया या संस्थेच्या ‘वन इंडिया अवॉर्ड २०२२’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी ईशान्य भारतातील एका व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. यंदा अरुणाचल प्रदेशामधील न्यिशी जमातीच्या श्रद्धा पुनर्जागरण चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते श. तेची गुबिन यांना मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देणार आहे. हा सोहळा १५ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात होत आहे. या कार्यक्रमाचे स्वागतगीत गाण्याचा बहुमान वझ्झर फाटा (ता. अचलपूर) येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहातील अंध मुलगी गांधारी हिला मिळाला आहे. ती ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत सादर करणार आहे. यासाठी तिला भाजप महासचिव सुनील देवधर यांनी आमंत्रित केले. ती सध्या अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असून म्युझिक थेरपीच्या माध्यमातून रुग्णांना आनंद देत आहे.
गांधारीला २५ वर्षांपूर्वी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावरून तिला वझ्झर येथील अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात आजीवन पुनर्वसनाकरिता न्यायालयाच्या आदेशावरून देण्यात आले होते. शंकरबाबांनी आई-वडिलांची भूमिका चोख बजावत तिला योग्य शिक्षण दिले. अंध विद्यालयामध्ये ती बारावी झाली. त्यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई येथील संगीताच्या सात विशारद परीक्षा प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण केल्या.