अमरावती - खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांचे पोस्टर्स व बॅनर्स शुक्रवारी तातडीने काढण्यात आले. येथील सायन्सकोर मैदानात युवा स्वाभिमान पक्षाचा कृषी महोत्सव होत असून, त्या महोत्सवस्थळी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांची छायाचित्रे असलेले मोठे बॅनर्स प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ते बॅनर्स हटविण्यात सुरूवात झाली. राणा दाम्पत्याने आचारसंहिता भंग केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यानंतर, आमदार रवि राणा यांनी संताप व्यक्त केला आहे, तसेच, या कारवाईला महाविकास आघाडीचे नेते जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
अमरावतीत युवा स्वाभिमानकडून 12 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत कृषी महोत्सव आयोजन करण्यात आले. दरम्यान, महोत्सवाच्या गेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांचे फोटो असल्याने जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत महोत्सव बंद करण्याचे आदेश देत नोटीस बजावली. जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीत आचारसंहिता लागली असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर, आमदार रवि राणा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
महविकास आघाडी सरकारच्या काही नेत्यांनी, महोत्सव बंद पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाब आणला, बॅनर फाडले. मविआच्या काळात कधीही शेतकऱ्यांचे कार्यक्रम झाले नाहीत. उद्धव ठाकरे कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. बॅनरवर असलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आम्ही कोणतेही आचारसंहितेचे उल्लघन केले नाहीत. शेतकरी हिताच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला आहे, असे रवी राणा यांनी म्हटले. दरम्यान, नोटीस बजावूनही हा कार्यक्रम होणारच, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर कार्यक्रम
सध्या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून, त्यादरम्यान १२ जानेवारीपासून सुरू झालेल्या युवा स्वाभिमान महोत्सवाच्या अग्रभागावर राणा दाम्पत्याचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच, शहर कोतवाली पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. सुमारे दोन तास ते बॅनर्स हटविण्याची कारवाई सुरू होती.