गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेल्या कापसाला खुल्या बाजारात क्विंटलमागे ७१०० तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७४५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. रुई आणि सरकीच्या भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर माधारले आहेत. त्यामुळे तूर्तास भाववाढीची शक्यता नाही. परदेशात कापसाची निर्यात थांबली आहे. अशा परिस्थितीत दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवण हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.
जिल्ह्यात कॅश क्रॉप म्हणून कापसाची ओळख आहे. किंबहुना खरीप हंगामात कपाशीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. यावर्षी जिल्हाभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. किंबहुना देशभरात हीच स्थिती असल्याने कापसाचे सरासरी उत्पादनात कमी येत आहे. त्यातच कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांची दरवर्षी होत असलेली दरवाढ सोबतच कापूस वेचणीचा दर १० रुपये किलोवर गेल्याने उत्पादनखर्चात वाढ होत असताना त्या तुलनेत मार्केटमध्ये भाव नाही. कापसाला सध्या उठावच नसल्याने खुल्या बाजारात आवक थंडावली आहे. थोडीफार आवक सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे. तिथेही आठ टक्के आर्द्रतेच्या निकषात हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी मिळत आहेत. परंतु खासगी खरेदीपेक्षा किमान क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये जास्त मिळत असल्याने अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत किंवा खेडा खरेदीत देत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत आहे. उर्वरित शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणूक करीत असल्याने सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.
गारमेंट हब बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली बांगलादेशात गारमेंटचा मोठा उद्योग असल्याने भारताकडून कापूस आयात केला जातो. सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे भारतातून होणारी निर्यात थांबली आहे. याचा फार मोठा फटका कापूस उद्योगाला बसला आहे. बांगलादेशात किमान १५ ते १६ लाख व चीनमध्ये १० ते १२ लाख गाठींची निर्यात व्हायची, यंदा निर्यात बंद असल्याने कापसाला उठाव नसल्याचे वास्तव आहे.
७० सेंट पर पाउंडवर स्थिरावला रुईचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा ७० सेंट पर पाउंड (४५० ग्रॅम) असा भाव आहे. देशांतर्गत गाठीचा ५२ ते ५३ हजारांपर्यंत (१७५ किलो) भाव मिळत आहे. शिवाय सरकीलादेखील देशांतर्गत ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल भाव आहे. या दरावरच सध्या बाजारभाव स्थिरावला आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ झालेली नसल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
"आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. परदेशात जाणारी निर्यात थांबली आहे. त्यामुळे खासगी खरेदीत कापसाची आवक थंडावली आहे. थोडीफार खरेदी सीसीआयच्या केंद्रांवर होत आहे."- पवन देशमुख, शेतमाल दराचे अभ्यासक.