आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांचे कामबंद आंदोलन;
मेळघाटातील कुपोषित बालक गर्भवती मातांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
चिखलदरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानधन व इतर विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आठवड्यापासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे कामबंद आंदोलन सुरू असून, त्याचा विपरीत परिणाम मेळघाटात पावसाळ्याचे दिवस पाहता कुपोषित बालक व गर्भवती स्तनदा माता यांच्या आरोग्यावर होण्याची भीती वर्तविली जात आहे.
मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये आशा स्वयंसेविका चिखलदरा १६५, धारणी २००, गटप्रवर्तक १७, व २० अशा एकूण २७ आशा स्वयंसेविकांकडे एकूण बहात्तर प्रकारची कामे शासनाने सोपविली आहेत. त्यामध्ये गरोदर मातेला शासकीय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीकरिता प्रवृत्त करणे. मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे, बालकांची गरोदर माता व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करीत वेळोवेळी मदत करून त्यांना प्रवृत्त करणे लसीकरण करून घेणे.
0 ते 6 वर्षांतील बालकांचा काळजी घेण्यासाठी एक दिवसाआड त्यांची भेट घेणे. गटप्रवर्तकावर आशा स्वयंसेविका करीत असलेल्या कामासंदर्भात माहिती घेऊन त्याच्या नोंदणी घेणे व योग्य प्रकारे काम करून घेण्याची जबाबदारी आहे. हे काम करीत असताना त्यांना कामाच्या मोबदल्यात तुटपुंजा मोबदला दिला जात असून, गावागावात भेटी देण्यासाठी जाणाऱ्या गटप्रवर्तकांना केवळ प्रवास भत्ता दिला जातो.
राज्यभरातील या आरोग्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असा आरोप कामबंद आंदोलनातील अनुराधा रहाटे, प्रमिला ठवरे, ललिता जावरकर, लता येवले, शशी बेलसरे, रंजना सुरत्ने, अस्मिता काकडे, निगार शेख, संगीता सोनवणे, चंद्रकला कवडे, रेणू आलोकार, ममता खडके, शुभांगी कांबे आदींनी केला आहे.
बॉक्स
पंधरा रुपये रोज, आशाला हजार रुपये महिना
कोरोनाकाळात रात्रंदिवस काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना हजार रुपये महिना तर गटप्रवर्तकांना पंधरा रुपये रोज शासनाच्या वतीने देण्यात आला. अत्यंत तुटपुंजी ही मदत असून, तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने बंद करावे व वेतन श्रेणी लागू करून 21 हजार रुपये गटप्रवर्तक, तर 18 हजार रुपये आशा स्वयंसेविका यांना देण्याची मागणी राज्यभरातून होत असून, त्यासाठी 15 तारखेपासून आंदोलन छेडण्यात आले आहे. परिणामी सर्वत्र काम बंद असल्याने मेळघाटात त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती आता वर्तविली जात आहे.