जितेंद्र दखने, अमरावती: देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून यंंदाही विठ्ठलभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्थानिक एसटी महामंडळाने आतापर्यंत ११३ एसटी बसेस भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरला रवाना केल्या आहेत. यामध्ये जवळपास पाच हजारांवर वारकरी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच पंढरीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा’ ही एकमेव धारणा ठेवत हजारो वारकरी आपल्या वारीचा नित्यक्रम पाळतात. जीवात जीव असेपर्यंत वारी खंडित होऊ नये, शेवटच्या श्वासापर्यंत परमात्मा पांडुरंगाची सेवा घडावी, असे मनी बाळगून वारकरी आपला संकल्प पूर्ण करतात.
वारीमुळे चित्तशुद्धी होत असल्याने दरवर्षी आषाढीला अनेकांची पावले विठूरायाच्या भेटीला पंढरपूरकडे वळतात. याच भाविक भक्त वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीसाठी जिल्ह्यातील चांदूर बाजारमधील शिरजगाव, भातकुली तालुक्यातील खारतळेगाव, नांदगाव खंडेश्वर व अन्य काही १२ गावांमधून थेट एसटी बसेस भाविकांना घेऊन विठ्ठलाचे भेटीला रवाना झाल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने खास आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या सोयीसुविधेसाठी १३ ते २२ जुलैपर्यंत थेट एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पंढरपूर यात्रेकरिता जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे या एसटी आगारामधून पंढरपूर यात्रा स्पेशलकरिता १२४ बसेसचे नियोजन केले होते. यानुसार १६ जुलैपर्यत जिल्ह्यातून आठ आगारांमधून एसटी महामंडळाच्या ११३ बसेस पंढरपूरला रवाना करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश गावांमधील ५ हजारांवर वारकरी मंडळी विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी वारीसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व अन्य प्रवाशी पंढरपूरला रवाना झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांनी दिली.
आगारनिहाय बसेस संख्या
अमरावती १८, बडनेरा २१, परतवाडा १५, वरूड १६, चांदूर रेल्वे १६, दर्यापूर १७, मोर्शी ११, चांदूर बाजार १० याप्रमाणे एसटी बसेसचे महामंडळाने नियोजन केले होते. यापैकी ११३ बसेस मंगळवारपर्यंत रवाना झाल्या आहेत. पंढरपूर यात्रा कालावधीत १३ ते २२ जुलैपर्यंत एसटी बसेस धावणार आहेत.