धानोरावासीयांचा सवाल : आदिवासी आयुक्तांना निवेदन सादरमोर्शी : धानोरा येथील आश्रम शाळेच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. विद्यार्थ्यांसाठी टिनाचे शेड व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पक्के क्वॉर्टर्स बांधल्याने ही आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी की अधिकाऱ्यांसाठी, असा सवाल आदिवासी आयुक्तांना सादर निवेदनातून आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. धानोरा हे ९८ टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. येथे सन २००३ पासून शासकीय आदिवासी आश्रमशाळा सुरू आहे. सद्यस्थितीत या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या बांधकामाकडे अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही. वॉल कंपाऊंडपासून या बांधकामाची सुरूवात करण्यात आली. यासाठी आवश्यक रेती गावाशेजारच्याच नाल्यातून, नदीतून आणण्यात आली. याबाबत गावकऱ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाकडे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी टिनाचे शेड असून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पक्के बांधकाम केले आहे. शिवाय एका हॉलमध्ये ३० मुलींची निवासाची व्यवस्था केली आहे. मुलांसाठी नीट वसतिगृहदेखील नाही. प्रसाधनगृहे नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. शाळेला स्वतंत्र गोदाम नाही. स्वयंपाकघर नाही. कोट्यवधींचा खर्च करून नेमके काय साधण्यात आले, असा सवाल यामुळे गावकरी उपस्थित करीत आहेत. शिवाय बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच या आदिवासी आश्रमशाळेचे लोकार्पणदेखील करण्यात आले. हा अन्याय दूर न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. याबाबत गावकऱ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी की कर्मचाऱ्यांसाठी?
By admin | Published: June 17, 2016 12:26 AM