लाखो रुपयांचा महसूल दुर्लक्षित : पर्यटकांना प्रतीक्षा
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प व टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यातील निसर्ग पर्यटन सुरू करण्याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने अमरावती व यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे अनुमती मागितली आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रात निसर्ग पर्यटन सुरू ठेवण्यास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी २४ जूनच्या पत्रानुसार अनुमती दिली आहे. याच अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना १३ जुलैला अटी व शर्तींसह निसर्ग पर्यटन सुरु करण्यास पत्र दिले आहे. यात पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील पर्यटन सुरू करण्याबाबत परवानगी मागितली आहे.
अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना २५जूनला पत्र देऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत व पर्यटन सुरू करण्याबाबत अनुमती मागितली आहे. यात वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपाहारगृह, होम स्टे आणि व्याघ्र प्रकल्पाद्वारे घेण्यात येणारे इतर उपक्रम सुरू करण्यास, अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितली आहे. मात्र, अजूनपर्यंत ही अनुमती मिळालेली नाही.
लाखोंच्या महसूल दुर्लक्षित
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चिखलदरा, आमझरी, सेमाडोह, कोलकास, हरिसाल या सेंटरवर नियमितपणे निसर्ग पर्यटनाकरिता पर्यटक येतात. जंगल सफारी, हत्ती सफारीचा ते आनंद घेतात. तेथील निवास व्यवस्थेचा, उपहारगृहाचा लाभ घेतात. यातून व्याघ्र प्रकल्पाला दरमहा दहा ते पंधरा लाखाचा महसूल मिळतो. हा लाखो रुपयांचा महसूल आज बुडत आहे.
टिपेश्वर एक अभयारण्य
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणारे, टिपेश्वर व पैनगंगा हे व्याघ्र प्रकल्प नाहीत. ते अभयारण्य आहेत. अभयारण्याला राष्ट्रीय व्याघ्र कौन्सिलचे नियम, निर्बंध लागत नाहीत. त्यामुळे तेथील पर्यटन सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नाही. टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प नसला तरी वाघाचे हमखास दर्शन देणारे ते अभयारण्य आहे. ताडोबाच्या तोडीस तोड टिपेश्वरला व्याघ्र दर्शन घडते.