अमरावती : शहरात इर्विन चौक, आयएमए व्हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय व जुना बियाणी चौक हा वर्दळीचा रस्ता असतांना ठिकठिकाणी उखडलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे या मुख्य मार्गाची दुरुस्तीची मागणी भाजपा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांनी गुरुवारी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, वनविभाग, महावितरणसह जिल्हापरिषदेसारखी महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची कामानिमित्त वर्दळ आहे. या रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाल्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होत आहे. शहरातीत महत्त्वाचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या रस्त्याची मजबुतीकरणाची मागणी कुळकर्णी यांनी केली. यावेळी नितीन धांडे, संजय जाधव, अतुल आळसी, शिवकुमार यादव, किरीट भैया, अशोक यादव, अजय मंत्री, प्रवीण महल्ले, राजेश महाजन, सुनील डेहणकर, कोमल बुब आदी उपस्थित होते.
बॉक्स
शहरातील विजेचा लपंडाव थांबवा
सध्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. दिवसा कमालीचा उकाडा असल्याने नागरिक त्रस्त असताना या प्रकारामुळे समस्येत वाढ होत आहे. याशिवाय शहरात अनेक नागरिक वर्क फ्राम होम काम करतात, विद्यार्थ्याचे ऑनलाईन क्लास सुरू असतात. अशावेळी वीजपुरवठ्यात खंडित होत असल्याने त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विजेचा लपंडाव थांबवा, अशी मागणी प्रणय कुळकर्णी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली.