अमरावती : कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीसच हल्लेखोरांकडून लक्ष्य बनत आहेत. पोलिसांच्या अंगावर चाकू घेऊन जाण्यासही हल्लेखोर घाबरत नाहीत. वाहतूक अंमलदारांना तर अनेकदा अशा प्रकारांना, भीतीला सामोरे जावे लागते. वाहतूक नियमांचे पालन करण्याऐवजी नियम मोडण्याकडेच अनेकांचा कल आहे.
विशेषतः वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यातच अनेकजण धन्यता मानतात. ट्रिपल सीट, भरधाव वाहन चालवणे, वन-वेतून जाणे, बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. याचा राग पोलिसांवरच काढण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. हे पोलीस दलाच्या दृष्टीने अधिक गंभीर आहे. मागे फ्रेजरपुरा हद्दीत एका पोलिसावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. १३ नोव्हेंबरच्या हिंसाचारादरम्यानदेखील पोलिसांना लक्ष्य करण्यात आले.
२५ जणांच्या मुसक्या आवळल्या वर्षभरात
शहर तथा जिल्ह्यात पोलिसांवर हल्ले करण्यात आले. यात काही पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले. अशा घटनांमधील २५ पेक्षा आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले.
पोलिसांवरील हल्ल्याची ही आहेत उदाहरणे
१) वडरपुरा येथे श्रीकृष्ण इंगोले या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. स्वत:जवळचा चाकू न देता आरोपीने तो इंगोले यांच्या छातीवर चालवला होता. त्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
२) चांदूर रेल्वे गावठी दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. मांजरखेड येथील तांडा परिसरात ही घटना घडली होती. गावठी दारू पकडण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी मांजरखेड परिसरात असलेल्या तांड्यावर गेले होते.
३) सन २०१७ च्या मे महिन्यात वडाळी परिहारपुरा येथे अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला केला होता. नोव्हेंबर २१ मध्ये राजकमल चौकात भलामोठा दगड पोलिसांच्या दिशेने टाकण्यात आला.
काय म्हणतात पोलीस अधिकारी?
वडरपुरा येथे यंदा एका पोलिसावर हल्ला करण्यात आला. १३ नोव्हेंबरच्या हिंसाचारादरम्यानदेखील पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते. वाहतूक अंमलदारांना अनेकदा वाहनचालकांच्या हुज्जतबाजीला सामोरे जावे लागते. तर, आरोपींची धरपकड करतेवेळी शासकीय कामकाजातही अडथळा निर्माण केला जातो.