अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जावून स्थानिक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत. तिकिटांचे वाटप मुंबईत बसून होणार नाही, तर कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच उमेदवारी जाहीर होईल. महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचारी सरकार असून, हे सरकार हटविण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस कटिबद्ध असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी केले.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा बैठक बुधवारी झाली. यात अमरावती आणि अमरावती जिल्ह्याची आढावा घेण्यात आला. या बैठकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार मुकुल वासनिक, खासदार बळवंत वानखडे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार यशोमती ठाकूर, सतेज पाटील यांच्यासह शिवाजीराव मोघे, अविनाश पांडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत तसेच इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
१८० पेक्षा जास्त जागा मिळतील : बाळासाहेब थोरातराज्यात अस्तित्वात असलेले महायुतीचे सरकार घटनाबाह्य आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना सोबत घेऊन तसेच आमदारांना पळवून नेत हे सरकार भाजपने स्थापन केले. सध्या महाराष्ट्र भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. अशा या सरकारला जनता जागा दाखवेल. आगामी विधानसभेत १८० प्लस जागा या महाविकास आघाडीला मिळतील, असे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवण्याचे काम केले : विजय वडेट्टीवरमहाराष्ट्राची अस्मिता गुजरात समोर गहाण ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. राज्यातील जमिनी या अदानींच्या घशात घातल्या जात आहेत. सरकार बदल्याच्या भावनेने ते विरोधकांना सीबाीआय, ईडीच्या नोटिसा पाठवित आहेत. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. परंतु निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राबविण्यात येत आहे. अडीच वर्षे या सरकारला लाडकी बहीण दिसली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केली.
लाडकी माझी खुर्ची योजना : नाना पटोलेमहाविकास आघाडीतून मुख्यमंत्री कोण राहणार हे सध्याच्या घडीला महत्त्वाचे नाही. सध्या गुजरातमध्ये महाराष्ट्राला गहाण ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमान जपण्यासाठी आधी महाराष्ट्र वाचविणे हे काँग्रेससाठी सर्वांत महत्त्वाचे काम आहे. महाराष्ट्राला विकासासाठी आतापर्यंत काँग्रेसने काम केले. परंतु सध्या महाराष्ट्र अधोगतीला नेण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. महाविकास आघाडीला सोबत घेऊनच कॉँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे. सध्या लाडकी माझी खुर्ची योजना ही महायुतीने आणली आहे. महाराष्ट्राची जनता ही बहुमतांनी महाविकास आघाडीला निवडून देईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.