मोर्शीत बैठक : नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मंथनमोर्शी : उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरिता नेट/सेट शिक्षकांच्या नियुक्त्या थेट शासन किंवा नेट सेट ब्युरोंमार्फत व्हाव्यात, पारंपरिक अभ्यासक्रमात बदल करून कौशल्याधिष्ठित, पारंपरिक व्यवसायाशी निगडित अत्याधुनिक उच्च शिक्षणाची त्याला जोड देण्यात यावी, अशा सूचना गुरुवारी स्थानिक भारतीय महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत पालक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थ्यांनी केल्यात. नवीन शैक्षणिक धोरण निर्धारित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे थेट गाव खेड्यापर्यंतच्या लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याअंतर्गत जिल्हास्तर, तालुका स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कालमर्यादेच्या आत सर्वसामान्य लोकांसोबतच, शिक्षणात रुची घेणारे, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकांची संयुक्त बैठक आयोजित करुन त्यांच्या कडून सुचना मागविण्यात आलेल्या आहेत. स्थानिक भारतीय महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा नोडल अधिकारी गोपिचंद मेश्राम, उद्घाटक उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आणि अतिथी म्हणून नगराध्यक्षा प्रतिभा कटीस्कर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, पंचायत समितीच्या सभापती पद्मा पांचाळे, स्थानिक आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एन. जे. मेश्राम उपस्थित होते. मुलींना शिक्षणात ५० टक्के आरक्षण असावे, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात यावे, कौशल्य विकासाशी निगडित धोरण आखण्यात यावे, शेती विषयक प्राथमिक ज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात यावा, अशा सूचना उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी करतानाच जोपर्यंत प्राथमिक शिक्षणात बदल होणार नाही, पाया मजबूत होणार नाही तोपर्यंत उच्च शिक्षणात आमुलाग्र बदलाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी विशद केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती वृषाली विघे, पं.स. सभापती पद्मा पांचाळे यांनीही आपले समयोचित विचार मांडले. प्राचार्य मेश्राम यांनी अध्यक्षीय विचार मांडले. कार्यशाळेची प्रस्तावना भीमराव चंदनकर यांनी मांडली. संचालन साबळे यांनी केले. आभार प्रदर्शन खांडेकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)शिक्षणाच्या दर्जावरही बैठकीत विस्तृत चर्चाजोपर्यंत प्राथमिक शिक्षणात बदल होणार नाही, तोपर्यंत उच्च शिक्षणात बदल करणे चुकीचे आहे, असा सूर भारतीय महाविद्यालयात शैक्षणिक धोरणासंदर्भात आयोजित बैठकीतून निघाला. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर नेट-सेट झालेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या शासनाने ब्युरोमार्फत करण्याचे अनेकांनी सुचविले. सभेत मुलींच्याही शिक्षणाच्या समस्येवर मार्गदर्शन करण्यात आले.
प्राध्यापकांच्या नियुक्त्या नेट-सेट ब्युरोमार्फत करा
By admin | Published: October 31, 2015 1:10 AM