दोन महिन्यांपासून केंद्रचालकांना अनुदानाची प्रतीक्षा, रस्त्यावरील नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना लाभ
अमरावती : कोरोनाकाळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. यातून अनेकांचे पोट भरले. मात्र, एक ते दोन महिन्यापासून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान थकले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले, तर अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. अशातच राज्य सरकारने मदतीचा हात पुढे करीत या संकटकाळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन थाळी देण्याचे ठरविले.
जिल्ह्यातील २३ शिवभोजन केंद्रांतून अनेकांना पोटभर जेवण मिळत असून या योजनेमुळे गरिबांना दिलासा मिळाला. मात्र, सध्या महिनाभराचा कालावधी लोटला असतानाही केंद्रचालकांना अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. तरीही गरिबांना मोफत भोजन देण्याचा ध्यास त्यांनी सोडला नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. अमरावती शहरात सहा व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १७ शिवभोजन केंद्रांतून गरिबांना नि:शुल्क पोटभर भोजन दिले जात आहे. एकंदर ही योजना कोरोना संकटात गरजूंसाठी लाभदायी ठरली आहे.
प्रतिथाळी ४० रुपये अनुदान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत थाळीच्या अनुदानासाठी शासनाकडून शहरी भागासाठी प्रत्येकी ५० रुपये, तर ग्रामीण भागासाठी ३५ रुपये अनुदान मिळते. शिवभोजन थाळीत वरण, भात, भाजी, दोन चपात्यांचा समावेश असतो.
अनुदान रखडूनही थाळी संख्या वाढली
शहरातील पीडीएमसीतील शिवभोजन केंद्रात लॉकडाऊनमध्ये पूर्वी दररोज १९० थाळी वाटप केले जात होते. मात्र, आता तेथे रोजी २८५ थाळी वितरित होत आहेत. सामान्य नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांनाही त्याचा लाभ होत आहे. मात्र, शहर हळूहळू अनलाॅक होत असताना काही केंद्रांवरील वितरणात घट आली आहे.
कोट
केंद्रचालक काय म्हणतात...
कुणीही गरजू उपाशी राहू नये, हा योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मे आणि जूनमध्ये थाळी संख्या वाढवून दिली. अलीकडे पीडीएमसीमधील केंद्रावरून दररोज २८५ जणांना मोफत शिवभोजन थाळी देत आहोत. अडचणी येत राहतात, पण, सामान्य लोक रोज पोटभर जेवतात त्याउपर समाधान तरी काय?
- अतुल इंगोले, शिवभोजन केंद्रचालक, पीडीएमसी
कोट २
एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. आमच्या केंद्रात मागील महिन्यांपासून थाळी संख्या वाढविण्यात आली. दोन महिन्यांचे अनुदान अप्राप्त आहे. मात्र, कुठलीही तक्रार नाही. पुण्याचे काम करतोय.
- धीरज कोकाटे, बाजार समिती केंद्रचालक
कोट
जिल्ह्यात एकूण २३ शिवभोजन केंद्रांतून गरजूंना पोटभर जेवण दिले जात आहे. अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विभागाकडे पुरेसा निधी आहे. काहींचे जीएसटी क्रमांक, तर काहींची देयके अद्याप अप्राप्त आहेत.
अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र २३
आतापर्यंत किती जणांनी घेतला लाभ ६,८२, ९५१
----------------------