अमरावती : जिल्ह्यात एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठांच्या जाचापायी त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वलगाव ठाण्यात कार्यरत सहायक उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार (वय ५४, रा. गगलानीनगर, वडाळी) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ४ जानेवारीपासून आजारी रजेवर असलेल्या अडोकार यांचा मृतदेह बुधवारी पहाटे वडाळी ते एसआरपीएफ मार्गावरील सागवानाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, हा मृताच्या मुलाच्या तक्रारअर्ज नोंदवून घेण्यात आला.
निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या त्यांच्या वडिलांची मंगळवारीच तेरवी झाली. त्यामुळे सारे नातेवाईक गगलानी नगर येथे अडोकार यांच्या घरी जमले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे ५.५० च्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या काहींनी एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. सहाच्या सुमारास ठाणेदार अनिल कुरळकर हे तेथे पोहोचले असता काहींनी मृताची ओळख विजय अडोकार अशी पटवली.
काही वेळातच त्यांचे कुटुंबीयदेखील घटनास्थळी पोहोचले. आपले वडील रात्रीलाच केव्हा तरी घराबाहेर पडल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले. याप्रकरणी वलगावच्या ठाणेदाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, असा तक्रारअर्ज मृताच्या मुलाकडून फ्रेजरपुरा पोलिसांत देण्यात आला. तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेण्यात आला. मात्र, पुढे पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार व पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिल्याने दुपारी अडोकार यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अडोकार हे ४ जानेवारीपासून सलग व त्यापूर्वी २३८ दिवस आजारी रजेवर होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
अशी आहे तक्रार
आपल्या वडिलांनी बदलीसाठी वारंवार विनंती केली. मात्र, वलगावच्या ठाणेदारांनी त्यांना बदलीसाठी नाहक त्रास दिला. बदली न करता त्यांना निलंबनाची धमकी देण्यात आली. तो त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज मृताचा मुलगा केतन अडोकार यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिला.
विजय अडोकार हे आजारी रजेवर होते. त्यांच्या मुलाचा तक्रार अर्ज घेण्यात आला. प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
एम. एम. मकानदार, पोलीस उपायुक्त