अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदेबाबत तक्रारींचा ओघ कायम आहे. दी महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेसने ईटकॉन्स एजन्सीच्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले असून, सर्वात कमी दर असताना डावलण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र, १६ जुलै रोजी होणाऱ्या स्थायी समितीत एजन्सी नियुक्तीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु, याप्रकरणी राजकीय दबाव वाढल्याने निर्णय घेताना आता प्रशासन ‘आस्ते कदम’च्या भूमिकेत आहे.
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना मंगळवारी देण्यात आलेल्या निवेदनातून दी महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेसने ‘आऊट सोर्सिंग’ निविदेत सर्वात कमी दर असताना डावलल्या जात असल्याबाबत लक्ष वेधले
आहे. संस्थेने निविदेच्या अटी, शर्ती पूर्ण केल्या असून, सर्वात कमी दर आहे. त्यामुळे हे दर स्वीकार करुन कार्यारंभ आदेश द्यावे, अशी मागणी जयकुमार काळे यांनी केली आहे. ई-निविदेत आठ एजन्सीत सहभाग घेतला आहे. असे असताना ईटकॉन्सने ईएमडी प्रमाणपत्र, एनएसआयसी नोंदणी केलेली नाही. शॉप ॲक्ट मुदतबाह्य आहे. अनुभव देखील नसून, ही एजन्सी माहिती, तंत्रज्ञानाशी निगडीत नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे. एकिकडे तक्रारींचा ओघ वाढत असताना महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासंदर्भात निवड समितीने एजन्सी नियुक्तीबाबत मते नाेंदविली आहे. आता एजन्सी नियुक्तीबाबत अंतिम निर्णयासाठी १५ जुलै रोजी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे ‘आऊट सोर्सिंग’ ही निविदा प्रक्रिया पूर्ण प्रारंभ करावी, असा रेटा महापालिका प्रशासनावर वाढत आहे.
काेट
तक्रारीच्या अनुषंगाने खात्री करण्यात येत आहे. मात्र, जेव्हा तांत्रिक निविदा उघडल्या तेव्हाच आक्षेप घेतला तर प्रश्न सुटला असता. आता निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तक्रारी, आक्षेप घेणे संयुक्तिक नाही. परंतु, याप्रकरणी प्रशासन नियमानुसारच कार्यवाही करेल.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका