अमरावती : माना ते कुरुमदरम्यान रेल्वे ट्रॅकवर सोमवारी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या बराच वेळपर्यंत खोळंबून होत्या. प्रवाशांची व रेल्वेगाड्यांची बडनेरा रेल्वेस्थानकावर एकच गर्दी होती. सायंकाळनंतर प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप झेलावा लागला.
माना ते कुरुमदरम्यान ६२९/२८ क्रमांकाच्या खांबाजवळ पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात शिरल्याने अप आणि डाऊनच्या रेल्वेगाड्या सायंकाळपासून विविध ठिकाणी खोळंबून होत्या. अमरावती मुंबई, पुरी-सुरत यासह इतरही प्रवासी, तसेच मालगाड्या बडनेरा रेल्वेस्थानकावर बराच वेळेपासून थांबून होत्या. विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा, नागपूर-पुणे, भुसावळ-वर्धा मेमू यासह इतरही बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या. बडनेरा रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांची, तसेच प्रवाशांची एकच गर्दी होती. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झेलावा लागला. दुरुस्तीच्या कामाला किती वेळ लागेल, हे रेल्वेचे कोणतेही अधिकारी सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रवाशांना नेमकी माहिती मिळत नसल्याची स्थिती होती. लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना या प्रकारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचे चित्र अनुभवता आले.