जिल्ह्यातून एकमेव, राज्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना ‘सक्सेस मंत्रा’परतवाडा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून संशोधन वृत्ती जपावी, असा ‘सक्सेस मंत्रा’ राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. स्थानिक नगर परिषद विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यानिमित्त ते बोलत होते.
अटल टिंकरिंग लॅब मिळालेले नगर परिषदेचे हे जिल्ह्यातील एकमेव विद्यालय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनीता फिसके होत्या. ही अटल टिंकरिंग लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास उपयोगी ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या. उद्याचे वैज्ञानिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रोत्साहित करावे, असे मत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनीही
व्यक्त केले. याप्रसंगी नगर परिषदेचे आरोग्य सभापती संदीप ऊर्फ बंटी ककरानिया, महिला बालकल्याण सभापती छाया भागवत, स्थायी समिती सदस्य संजय तट्टे, माजी नगराध्यक्ष ल.ज. दीक्षित, प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे, गणेश खडके, अनिल तायडे, नंदवंशी, ठाणेदार सदानंद मानकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही पार पडला. विद्यालयाचे प्राचार्य रामभरोसे गौर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन परतेकी यांनी केले. आभार रसायनशास्त्राचे प्राध्यापक रूपेश गाडेकर यांनी मानले. शाळेतील विज्ञान शिक्षक तथा अटल टिंकरिंग लॅबचे प्रभारी बेग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.सी. भगत, सय्यद, अर्जुन घुगे, नितीन गोहत्रे, अवस्थी यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.