प्रदीप भाकरे
अमरावती : वरूड तालुक्यात एकुण ९२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर, शेंदुरजना व पुसला मंडळात प्रत्येकी ११०.२५ मिमी, वरूड मंडळात ९६.७५, बेनोडात ७५ तर वाठोडा मंडळात १००.७५ मिमी पावसाची नोंद झाली.
संपूर्ण वरुड तालुक्यात रविवारी रात्रीपासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे वरुड तालुक्यातील नागठाणा प्रकल्प, सातनुर प्रकल्प, बाहदा, वाई, मालखेड, झटमझिरी, पुसला, शेकदरी, पाक प्रकल्प. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे छोटे-मोठे सगळे तलाव शंभर टक्के भरल्याने शेंदुरजना घाट गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या जीवना व देवना नदीला गेल्या ४० वर्षानंतर प्रथमच मोठा महापूर आला. शेंदुरजना घाट परिसरात अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे तिवसा घाट येथील पुराचे पाणी गावात घुसल्यामुळे येण्या जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता.
युवक वाहून गेला
वरूड तालुक्यातील रवाळा येथील अंकुश महादेव धुर्वे (३५) हा युवक वाहून गेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तालुक्यात पोहोचले असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आली असून, दोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वरूड, सातनूर, जरुड, पेठ मांगरुळी, शेन्दुरजनाघाट, अमडापूर या नदी काठावरील घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.