तिवसा : मोझरी व तिवसा हायवेवरील एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून दोघांची ५० हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८.३० च्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या.
पोलीस सूत्रांनुसार, ३४ वर्षीय महिला एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी मोझरी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रावर गेली. तेथे आधीपासून असलेल्या अनोळखी व्यक्तीने फसलेले कार्ड काढून देण्याची बतावणी करून महिलेचे कार्ड स्वत:जवळ घेतले व तिच्या नकळत आपले कार्ड पुढे केले. त्याचवेळी त्याने महिलेच्या एटीएमचा पासवर्ड चोरून बघितला. थोड्या वेळाने त्या अज्ञाताने महिलेच्या खात्यातून ३७ हजार रुपये काढले. नेमका असाच प्रकार गोपाल रमेश डाहे (२७, रा. भिष्णूर, ता. आष्टी, जि. वर्धा) यांच्यासोबत त्याच दिवशी तिवसा हायवेवरील एका एटीएममध्ये घडला. अज्ञाताने एटीएम कार्डची अदलाबदल करत डाहे यांच्या खात्यातून १३ हजार रुपये काढले. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी महिलेच्या तक्रारीवरून अनोळखी इसमाविरुद्ध भादंविचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला.
----------------------