काठेवाडींची अरेरावी : एमआयडीसी परिसरात कारवाईअमरावती : महापालिकेच्या मोकाट जनावरे पकडणाऱ्या पथकावर काठेवाडींनी मंगळवारी लाठीहल्ला केला. ही घटना येथील एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात असलेल्या उद्योग समूहात मोकाट जनावरे असल्याची तक्रार महापालिकेत प्राप्त झाली होती. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राबविण्यात आली. दरम्यान एमआयडीसी परिसरात मोकाट असलेली १० जनावरे पथकाने ताब्यात घेतली. मात्र ही जनावरे पथकाकडून सोडविण्यासाठी काठेवाडी पशुपालकांनी चक्क पथकावर लाठी हल्ला चढविला. पथकासोबत असलेल्या वाहनांवर देखील हे पशुपालक चालून आले. पथकाने ताब्यात घेतलेली १० जनावरे सोडविण्यात काठेवाडी पशुपालकांना यश आले. मोकाट जनावरे पकडताना पथकावर हल्ला चढविला, ही घटना महापालिकेचे पशुवैद्यक विभागप्रमुख सचिन बोंद्रे यांना कळताच काही क्षणातच पोलिसांसह पथक घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिसांसोबतसुद्धा काठेवाडी पशुपालकांनी वाद घातला. पोलिसांनी काठेवाडींनी ताब्यात घेतलेली मोकाट जनावरे सर्वप्रथम सोडविले. या लाठी हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी काठेवाडी पशुपालकांची एमआयडीसी परिसरात मोठी दहशत असल्याचे महापालिका पथकाला दिसून आले. झालेल्या प्रकाराची तक्रार राजापेठ पोलिसात करण्यात आली आहे.जयगोंविद जोवर, हर्षवर्धन शर्मा, गणेश मोहन, गजानन काठेवाडी, देवकोन राठोड यांनी जनावरे सोडली, वाहन तोडण्याची धमकी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, प्रशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविली आहे. मोकाट जनावरे पकडण्याच्या कारवाईत सचिन बोंद्रे, पोलीस निरिक्षक खराटे, पशूधन निरिक्षक गवई, शिपाई अब्दुल रफिक यांच्या कंत्राटी १० कामगार होते. काठेवाडींची ताब्यात घेण्यात आलेली मोकाट जनावरे कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
मोकाट जनावरे पकडणाऱ्या पथकावर हल्ला
By admin | Published: January 06, 2016 12:22 AM