चिखलदरा (अमरावती) : वाघाच्या कातडी प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर मध्यप्रदेशातील गावकºयांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. दगडफेकीत एक महिला वनरक्षक गंभीर जखमी झाली असून, त्यांना गुरुवारी अमरावती येथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील उमरी येथे हल्ला करण्यात आला. नमिता खिराळे असे गंभीर जखमी महिला वनरक्षकाचे नाव आहे. त्यांच्यासह आठ जणांचे पथक गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे यांच्या नेतृत्वातील पथक वाघाचे चामडे, अवयव तस्करी प्रकरणात हवा असलेला आरोपी सुखदेव सुजनसिंग ईवने (रा. उमरी) याला अटक करण्यासाठी गेले होते. गावकºयांनी वनविभागाच्या पथकावर प्रचंड दगडफेक केली. यामध्ये नमिता खिराळे जखमी झाल्या. वनविभागाच्या पथकाने सुखदेवला अटक करून सायंकाळी अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. त्याला १४ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंत १३ आरोपींना अटकचिखलदरा-परतवाडा रस्त्यावर वाघाच्या अर्धवट कातडीसह चार जणांना वन्यजीव विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. वाघाच्या अवयवांची तस्करी करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, यातील १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बैतूल जिल्ह्यातील उमरी येथे वाघाच्या अवयव तस्करी प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी पथक नेले होते. तेथे गावकºयांनी पथकावर दगडफेक केली. यात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. - लक्ष्मण आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिखलदरा